पुणे - कोरोनाचा समूह संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यात अंमली पदार्थ विक्रीवर बंदी असल्याने गावागावात गावठी दारू भट्ट्या वाढल्या आहेत. या अवैध दारुभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची मोहिम पोलिसांनी हाती घेतली असून आज घोडेगाव पोलिसांनी म्हाळुंगेतर्फे घोडा गावच्या हद्दीत घोडनदीच्या कडेला असणारी दारुभट्टी उद्ध्वस्त केली आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असताना नागरिकांनी घरात बसण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच दारू विक्री बंद केल्यानंतर अनेक ठिकाणी दारुभट्ट्या सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
आता या दारुभट्टी उद्ध्वस्त करण्याची मोहिम पोलिसांनी हाती घेतली आहे. घोडेगाव पोलिसांनी अवैध गावठी दारूभट्टीवर छापा टाकून दारू तयार करण्यासाठी लागणारे १२ हजार रूपयांची गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ४०० लिटर, ३५० रूपयांचे नवसागर जप्त केले, तर कच्चे रसायनाचा उग्र वास येत असल्याने नष्ट केले. याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई अमोल काळे यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस हवालदार दीपक काशिद, अमोल काळे, होमगार्ड स्वप्निल कानडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.