पुणे - मेट्रोच्या कोचचे मंगळवारी (31 डिसेंबर) महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मेट्रोचे ३७ टक्के काम पूर्ण झाले आहे. नववर्षात पिंपरी चिंचवड येथे मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे.
मेट्रो कोचच्या बाह्य भागावर पुण्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, पारंपरिक आणि औद्योगिक जडणघडणीचे प्रतिकात्मक रूप विषद केले आहे. मेट्रोच्या रंगसंगतीत नारंगी, निळा, जांभळा, हिरवा अशा रंगांचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, मेट्रो रूळावर धावण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना २०२१ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
हेही वाचा - पुणे मेट्रोची लवकरच होणार चाचणी; कोचच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
ही मेट्रो पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणार आहे. मेट्रोला नाव देण्यावरुन अनेक चर्चा सुरू आहेत. रविवारी मेट्रोच्या बोगी शहरात दाखल होताच महापौर उषा ढोरे यांनी मेट्रोला पुण्यासह पिंपरी-चिंचवडचे नाव देण्याची मागणी केली होती. ब्रिजेश दीक्षित यांनी याबद्दल सहमती दर्शवली आहे.