पुणे - एल्गार परिषदेच्या खटल्यामध्ये वरवरा राव आणि अन्य ८ जणांच्या जामिनावर ८ मार्चला सुनावणी होणार आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी नुकतेच ५ संशयितांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र न्यायालयामध्ये सादर केले आहे. यामध्ये सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण परेरा, वर्णन गोन्साल्विस आणि पाहिजे असलेला माओवादी नेता गणपतीचा समावेश आहे.
पोलिसांना तपासादरम्यान सर्व संशयित आरोपींविरुद्ध भूमिगत चळवळीसाठी पैसे गोळा करणे आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी कट रचल्या संदर्भात पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कट रचणे, देश विरुद्ध युद्ध पुकाराने, २ समाजामध्ये तेढ निर्माण केल्यासंदर्भात ठपका ठेवण्यात आला आहे.
आरोपपत्रानुसार वरवरा राव, अनिल सुरेंद्र गडलिंग यांनी माओवाद्यांना भारतीय सुरक्षा दलांच्या संदर्भात महत्त्वाची गोपनीय माहिती पुरवली होती. या माहितीच्या आधारे माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर हिंसक हल्ले केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचा दावाही पुणे पोलिसांनी केला आहे.