पुणे - आंबेगाव येथे भिंत पडून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या वारसांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या परिसरात भिंत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत ६ मजुरांचा मृत्यू झाला होता. तर ३ मजूर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील भारती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्याप्रमाणेच त्यांनी भारती हॉस्पीटललाही भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून मृत मजुरांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले.
राधेलाल पटेल (वय 25), जेटू लाल पटेल (वय.50), ममता राधेलाल पटेल (वय.22), जितू चंदन रवते (वय.24), जेटूलाल पटेल(45) , ममता पटेल (वय. 24) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्यील ४ जण मुळचे छत्तीसगड तर, २ हे मध्य प्रदेश राज्याचे रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भिंतीवर झाड कोसळल्याने ही दुर्घटना घडली होती.