पुणे - राज्यात शाळांना राज्य सरकारने दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. मात्र, महाविद्यालयांना सुट्टी देण्याच्या बाबतीत कोणताही निर्णय हा सरकारने घेतला नाही. त्यामुळे महाविद्यालयांनाही दिवाळीची सुट्टी मिळणार आहे की नाही याबाबत साशंकता प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या मनात आहे. शाळांना जशी दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्या त्याच धर्तीवर महाविद्यालयांनाही सुट्ट्या जाहीर कराव्यात, अशी मागणी पुण्यातील शिक्षक हितकारणी संघटनेने केली आहे. याबाबत तसेच पत्रही संघटनेने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना लिहिले आहे.
...तरीही वेगळ्या सुट्ट्याची मागणी -
गेल्या आठ महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. कोरोना संसर्गानंतर राज्यासह देशातील शैक्षणिक संस्था बंद असल्याने या शिक्षक-प्राध्यापकांना मागील सात-आठ महिन्यांपासून जवळपास सुट्टी मिळाल्यासारखीच स्थिती आहे. सरकार आता दिवाळीनंतर नववीच्या पुढील वर्ग सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत शाळा महाविद्यालये उघडणे अवघड असताना, या शिक्षकांना सध्या सुट्टीच आहे. त्यामुळे वेगळ्या दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्याच्या मागणीचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर राज्य सरकार महाविद्यालयांना आता सुट्टी कधी जाहीर करते? याकडे संघटनेचे लक्ष आहे.
हेही वाचा - 'जिहादी दहशतवाद' शब्दावरून पुणे विद्यापीठ गोत्यात...अखेर दिलगिरी