पुणे - पुण्याच्या कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आतेभावानेच 20 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केले. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या आईचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यामुळे ती कोथरूड परिसरातील आत्याच्या घरी राहते. 2019 ते 2020 या कालावधीत पीडित तरुणी घरात एकटीच असताना आरोपी गप्पा मारण्याच्या निमित्ताने तिच्याकडे जात असे. त्याने तिच्याशी जवळीक साधत लग्न करण्याचे आमिष दाखवले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या सर्व प्रकारातून पीडित तरुणी गर्भवती राहिली आणि तिने 31 ऑक्टोबर रोजी एका मुलीला जन्म दिला. ती गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
पीडितेच्या वडिलांना हा सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांनी पीडितेला घेऊन कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले.