पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. अगदी त्याच पद्धतीने विसर्जन सोहळा पार पडणार आहे. खरेतर दरवर्षी विसर्जन मिरवणूक म्हटलं की संपूर्ण शहरात उत्साह असतो. पुण्यातील प्रमुख लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता या रस्त्यावर गणेशभक्तांची गर्दी असते. ढोल ताशांचा आवाज गर्जत असतो, सनईचे सूर निनादत असतात. मंगलमय वातावरण असते. मात्र, यंदा कोरोनामुळे हा उत्साह दिसून येत नाही. गणेशोत्सवाप्रमाणेच यंदा बाप्पाचे विसर्जनही साध्या पद्धतीने होणार आहे. शहरात विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही. त्यामुळे मानाच्या प्रमुख मंडळासह इतर मंडळांनीही गणेशाच्या मंडपातच विसर्जन हौद तयार केले आहेत. त्या हौदातच बाप्पाचे विसर्जन होणार आहे.
परंपरेप्रमाणे पुण्याचे महापौर सकाळी १०.३० वाजता कसबा गणपतीला हार घालतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता पहिला मानाचा कसबा गणपतीचे विसर्जन होईल. दुसरा मानाचा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी १२.१५ वाजता, तिसरा मानाचा गुरुजी तालीमचा गणपती दुपारी १ वाजता, तर चौथा मानाचा श्री तुळशीबाग गणपती दुपारी १.४५ वाजता आणि पाचवा मानाचा केसरी वाडा गणपतीचे दुपारी २.३० वाजता विसर्जन होईल. त्यानंतर इतर महत्वाचे असलेले श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दुपारी ३.१५ वाजता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सूर्यास्ताच्या वेळी, ६:४७ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता अखिल मंडई मंडळाचा गणपती विसर्जन होईल.
घरगुती गणेश विसर्जनासाठी यंदा पुणे महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण १९१ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच ज्या नागरिकांस घरच्या घरी मूर्ती विसर्जन करणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी पुणे महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या विसर्जन हौदांची संख्याही वाढवण्यात आली आहे.