पुणे - जेसीबीच्या सहाय्याने बैलाला क्रूरपणे ठार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही घटना कुठली? तसेच हे घृणास्पद कृत्य करणारे लोक कोण? याची चर्चा सुरू होती. दरम्यान, हा व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या पौदवडी येथील असल्याचे उघड झाले असून 27 ऑक्टोबरला ही घटना घडली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणात भिगवण पोलिसांनी रोहित शिवाजी आटोळे (25) आणि भाऊसाहेब अण्णा खारतोडे (24) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - दिवे घाटामध्ये दिंडीत घुसला जेसीबी; संत नामदेव महाराजांच्या वंशजासह एक वारकरी ठार
इंदापूर तालुक्यातील पौदवडी येथे पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे बैल पिसाळला होता. तो इतर बैलांना आणि माणसांना मारू लागला. त्यामुळे त्याला जेसीबीच्या सहाय्याने क्रूरतेने ठार करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणात भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी रोहित शिवाजी आटोळे (25) आणि भाऊसाहेब अण्णा खारतोडे (24) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रोहित याने जेसीबीच्या सहाय्याने बैलाला मारले होते. तसेच नंतर बैलाला पुरण्यात आले होते. तर, भाऊसाहेब खारतोडे याने मोबाईलवरून या घटनेचे चित्रण केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या घटनेत प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.