पुणे FIR Against BJP MLA : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षेखाली बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय येथील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भाजपाचे पुणे कँटोन्मेंट मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्यानं त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलल्याचं समोर आलं होतं. पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं सुनील कांबळेंना चांगलच भोवलंय. भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आमदार सुनील कांबळेंनी पोलिसाला लगावली कानशिलात : शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील ससून रुग्णालय बी जे मेडिकल कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम संपल्यावर पोलीस कर्मचारी त्यांचं कर्तव्य बजावत असताना आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. यानंतर रात्री अखेर या मारहाण प्रकरणी सुनिल कांबळेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मी त्या व्यक्तिला ढकललं : पोलीस कर्मचारी त्यांचं कर्तव्य बजावत असताना आमदार सुनील कांबळे यांनी त्यांच्या कानाखाली मारली होती. या संपूर्ण प्रकारणावर स्पष्टीकरण देताना आमदार सुनील कांबळे म्हणाले की, "मी फक्त त्या व्यक्तिला ढकललं. मी कानशिलात लगावली नाही. कानशिलात मारण्याचा प्रकार वेगळा असतो. माझं आयुष्य झोपडपट्टीत गेलंय, कानशिलात कशी मारतात, हे मला चांगलं माहिती आहे."
हेही वाचा :