जुन्नर (पुणे)- जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील सिताराम शिंगोटे या शेतक-याने आपल्या अडीच एकर शेतातील मेथी पिकावर ट्रॅक्टर फिरवला. कोरोना, चक्रीवादळ ,आवकाळी पाऊस आणि आता वातावरणातील बदलामुळे पसरलेली रोगराई यामुळे शेतकरी हतबल झाला असताना आता भाजीपाल्यासह तरकारी मालांच्या कवडीमोल बाजारभावामुळे सिताराम यांच्यावर ही वेळ आली आहे.
मजुरीचाही खर्च मिळेना....
सिताराम शिंगोटे यांनी ६० हजार रुपये खर्च करून आपल्या अडीच एकर शेतात दोन महिन्यांपूर्वी मेथी पिकाची लागवड केली होती. अन एक महिन्यातच मेथीवर रोगराई पसरली. औषध फवारणीवर मोठा खर्च करुन मेथी जगवली. आता मेथीला चांगला बाजारभाव मिळेल अशी आशा असताना बाजारात मात्र एका जुडीला दोन ते तीन रुपये बाजारभाव मिळत होता. साधा मजूरीचाही खर्च मिळत नसल्याने हतबल झालेल्या सिताराम यांनी काढणीला आलेल्या मेथीवर ट्रॅक्टर फिरवला.
शेतमालाला हमीभाव द्या...
सिताराम शिंगोटे यांनी 60 हजार रुपये खर्च करुन आपल्या अडीच एकर शेतात मेथीला टाकली होती यामध्ये औषध फवारणी व मजुरीसाठी पाच हजारांचा खर्च झाला. मात्र सध्या मेथीला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने मजुरीचाही खर्च निघत नाही. शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी अनेक दिवसांपासून संघर्ष करत आहे. मात्र, योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतमालाची कवडीमोल किंमतीने विक्री होत आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. त्यामुळे शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.
हेही वाचा- आंदोलन आणखी तीव्र होणार; केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा कार्यालयांना शेतकरी घालणार घेराव
हेही वाचा- बारामती-सोमेश्वर-मुरूम-सुरवडी बससेवा सुरू, बारामती-फलटण तालुक्यातील प्रवाशांची सोय