पुणे - स्थानिक निधी लेखा परिक्षण विभागाकडुन दरवर्षी नगरपरिषदांचे लेखा परिक्षण करण्यात येते. 2018-19 या आर्थिक वर्षातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या लेखा परिक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या अहवालात मालमत्ता कर आणि अन्य करांच्या जमा रकमेपैकी 71 लाखांची रक्कम नगरपरिषदेकडे जमा न करता आधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमताने हडप केल्याचा आरोप, नगरसेविका संपदा सांडभोर यांनी केला आहे. नगरपरिषदेच्या निधीचा अपहार झाल्याची बाब गंभीर असून दोषींवर कारवाईची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
हेही वाचा... 'कमाई नसली तरी भुकेल्यांच्या तोंडी घास भरवू,' शेतकऱ्याकडून गोरगरिबांना २ टन भाजीचे वाटप
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या स्थानिक निधीच्या रक्कमेचा अपहार झाल्याची बाब मे 2019 मध्ये समोर आली. दरम्यानच्या काळात कर्मचारी व आधिकारी यांच्यावर कारवाईचा बडगा दाखवण्यात आला. यातील काही रक्कम नगरपरिषदेच्या बँक खात्यावर परस्पर जमा करण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या भष्ट्राचाराला राजकीय पाठबळ असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे संगनमताने नगरपरिषदेच्या पैशावर राजसोशपणे डल्ला मारला जात असल्याची तक्रार करण्यात येत असून, नगरपरिषदेला भष्ट्राचाराचा विळखा लागला असल्याचा आरोप राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगरसेविका आणि आरोग्य सभापती संपदा सांडभोर यांनी केला आहे.
नगरपरिषदेच्या स्थानिक निधी बरोबरच नगरपरिषदेच्या खरेदी प्रक्रियेच्या खर्चातही अनेक बेकायदेशीर बाबी लेखा परिक्षणात समोर आल्या आहेत. नियम बाह्य खर्च, तांत्रिक मंजुरी नसताना खर्च, जादा दराने खरेदी, विहित पद्धतीने खरेदी न करणे, योग्य रकमेच्या करारनामे न करणे इत्यादी बाबींची अनियमितता लेखा परिक्षणात आढळुन आली आहे. त्यामुळे नगरपरिषदेत अनेक नियमबाह्य कामकाज करुन खुलेआम भष्ट्राचार केल्याचा गंभीर आरोप नगरसेवक संपदा सांडभोर, सचिन मधवे, शंकर राक्षे, राहुल आढारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.