पुणे - राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुणे शहरातही उन्हाची तीव्रता वाढत असून या उन्हाचा चटका माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसत आहे. यामुळेच कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कूलिंग व्यवस्था बसविण्यात आली आहे. तसेच स्प्रिंकलर, कुलर, फॉगर सुरू करण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांसाठी दरवर्षी प्राणी संग्रहालय अशी व्यवस्था करत असते.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयातर्फे येथील वन्यप्राण्यांचा उन्हाच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय राबविले जात आहे. यामध्ये प्राण्यांच्या गुहेत कूलर बसविणे, वॉटरगनद्वारे भिंतीवर पाण्याचा शिडकावा करणे, खंदकांमध्ये पाण्याचा साठा करणे तसेच चिखलांच्या खड्ड्यांची व्यवस्था करणे, असे विविध उपाय करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त पिंजऱ्यांमध्ये पाण्याचा फवारा करणारे फॉगरदेखील बसविण्यात आले आहेत.
विविध उपाययोजनांद्वारे या प्राण्यांचे उन्हापासून बचाव करण्यासोबतच संग्रहालयातील हिरवाई जपण्यासाठीदेखील विशेष प्रयत्न केले जात आहे. यामुळे प्राण्यांना दिलासा मिळण्याबरोबरच संग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनादेखील उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार नाहीत. याची काळजीदेखील प्रशासनाकडून घेण्यात येत आहेत.
सध्या संग्रहालयात ६६ प्रजातींचे एकूण ४२० प्राणी आहेत. यामध्ये साप, सरपटणारे प्राणी, वाघ, बिबट्या, सिंह, हत्ती, अस्वल यांसारखे वन्यप्राणी तसेच हरिण, सांबार यांसारखे तृणभक्षी प्राणी यांचा समावेश आहे. या प्राण्यांच्या खंदकातही फॉग लावले आहेत. दरम्यान, सध्या सुट्या लागल्यामुळे प्राणी पाहण्यासाठी याठिकाणी मोठी गर्दी होत आहे.