पुणे : येथील काँग्रेस भवनात पुणे शहर काँग्रेसकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, विरोधकांना संपवण्याचे जे कटकारस्थान आणि डाव भाजपने केला होता त्याला आज सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला आहे. आम्ही त्यावेळेस देखील म्हटले होते की, आजपर्यंत कधीही एवढी शिक्षा कोणालाही झाली नव्हती; पण राहुल गांधी यांनी संसदेत उभे राहून अदानी यांचे भ्रष्टाचाराचे विषय काढले होते आणि ते संसदेत पुन्हा काढू नये म्हणून त्यांची खासदारकी घालवली गेली. राहुल गांधी यांना न्यायालयात खेचून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली; पण आज सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे यावेळी अरविंद शिंदे म्हणाले.
मुंबईतही कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला : राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मुंबईतही कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. एकंदरीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस आमदारांकडून राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी, आमदारांनी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी आमदारांनी राहुल गांधी यांचा फोटो देखील हातात घेतला होता. आनंदोत्सवावेळी जिलेबी देखील एकमेकांना भरविण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार देखील उपस्थित होते.
सत्यमेव जयते-नाना पटोले : आमच्या देशाची जी संस्कृती आहे त्या 'सत्यमेव जयते' या ब्रीदवाक्याचाच विजय आज झाला आहे. खोटी केस दाखल करून राहुल गांधी यांना शिक्षा झाली होती; पण सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निर्णय दिला. न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास दृढ झाला आहे. 'मोहब्बत की दुकान' जे राहुल गांधी यांनी उघडले आहे त्याचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
लवकरच संसदेत दिसतील राहुल गांधी : राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे ते लवकरच संसदेत पाहायला मिळतील, अशा प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. खरंतर राहुल गांधी यांच्या संदर्भातील शिक्षेबाबत गुजरात न्यायालयावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. अशा प्रकरणात कोणत्याही खासदाराला दोन वर्षांची शिक्षा न्यायालयाकडून इतिहासात आजपर्यंत ठोठावली गेली नाही. या निर्णयामुळे येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच 'इंडिया'ला फायदा होणार आहे, असे मत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
हेही वाचा: