पुणे - आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील बोअरवेल दुर्घटनेप्रकरणी जागा व बोअरवेल मालक अविनाश नामदेव जाधव यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यापुढे अवैध बोअरवेल खोदणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार असल्याचे तहसिलदार सुषमा पाईकर यांनी सांगितले.
थोरांदळे येथे ६ दिवसांपूर्वी आपल्या शेताला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी अविनाश जाधव यांनी बोअरवेल घेतला होता. मात्र, या ठिकाणी पाणी न लागल्याने तो बोअरवेल तसाच पडून राहिला. त्यावेळी या ठिकाणी रस्त्यावर काम करणाऱ्या मजुराचा ६ वर्षाचा मुलगा खेळत असताना बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली होती. १६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या मुलाला बाहेर काढण्यात आले होते.
याप्रकरणी मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून जागा मालक अविनाश नामदेव जाधव यांच्यावर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.