पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्य बाजारपेठेतील दुकाने स्वतःहून बंद केल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. हीच परिस्थिती पुण्यासह जिल्ह्याची आहे असे म्हणता येईल. याचमुळे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्बंध कडक करत आजपासून सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत कडक निर्बंध करत संचारबंदी आणि जमावबंदी केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून नागरिकांमधून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, धार्मिक स्थळे, चित्रपटगृह, मॉल हे सात दिवस बंद राहणार असून पार्सल सुविधा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मुख्य रस्ते, चौक अशा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, नागरिकांनी असाच प्रतिसाद दिल्यास कोरोनाची साखळी तोडणे यशस्वी होऊ शकते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे यांनी म्हटले आहे. सात दिवस नियमांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.