पुणे - उद्धव ठाकरे श्रावण बाळ आहेत, ते मुख्यमंत्री बनत आहेत, याचा खूप आनंद आहे... त्यांच्या सारखा मुख्यमंत्री राज्याला मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे. ते अत्यंत सक्षमपणे जनतेच्या हिताचे राज्य चालवतील अशा शब्दांत बाळासाहेब ठाकरे यांच्या बहीण आणि उद्धव ठाकरे यांच्या आत्या संजीवनी करंदीकर यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. संजीवनी करंदीकर यांनी उद्धव यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
उद्धव ठाकरे हे संयमी आणि समंजस व्यक्ती आहे. त्यांच्यावर झालेले खोटे आरोप ऐकून दुःख होते. मात्र, आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ते निश्चितच चांगल्या पद्धतीने पार पाडतील असा मला विश्वास आहे. आजचा हा क्षण पाहण्यासाठी बाळासाहेब आणि मिनाताई असायला हवे होते, असे संजीवनी करंदीकर म्हणाल्या.
हेही वाचा - तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करताहेत याचा आनंदच - छगन भुजबळ
उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंना पाच मुली आणि तीन मुले अशी एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी फक्त संजीवनी करंदीकर या हयात आहेत. त्यांची मुलगी म्हणजे उद्धव ठाकरेंची आतेबहीण स्वाती सोमण यांनीही उद्धव ठाकरेंसोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.