पुणे - जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नेचिंग करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. कोरेगाव भिमा, शिक्रापूर व दौड परिसरात आरोपी हा चोरी करत होता. मोठ्या शिफातीने आरोपीला जेरबंद करून अधिक तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेने शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गोपनीय बातमीदाराकडून माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २४/०५/२०२१ रोजी यातील फिर्यादी पुरुषोत्तम प्रकाश बेहरा (रा. शिरुर जि.पुणे) हे पुणे-नगर रोडने जात असताना कोरेगाव भिमा ता.शिरूर येथे ग्रीन गार्डन हॉटेल जवळ आले असताना त्यांच्या पाठीमागून एका अज्ञात इसमाने येवून फिर्यादीचे हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला होता. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरुन शिक्रापूर पोलीस स्टेशनला भादंवि क.३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पथक करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, आरोपी फिदा हुसेन मनुआली इराणी (रा. पाटील इस्टेट, इराणी वस्ती, शिवाजीनगर पुणे ) हा कोणताही कामधंदा करत नसून त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकल नं. एमएच १२ एससी ३६८२ चा वापर करून रोडने जाणारे येणारे लोकांची लुटमार करतो.
पाठलाग करुन अंगझडती
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे-नगर रोडने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सदर दुचाकी दिसली. तिचा पाठलाग करुन कोरेगाव भिमा येथे आडवून त्यावरील आरोपी फिदा यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन चोरीचे मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा किंमत रुपये ९०,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदरचे मोबाईलबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता विवो कंपनीचा मोबाईल कोरेगाव भिमा ग्रीन गार्डन हॉटेल जवळ एका इसमाकडून जबरदस्तीने हिसकावल्याचे सांगितले व ओपो कंपनीचा मोबाईल कोरेगाव भिमा जवळील गंधर्व गार्डन्स हॉटेल जवळ एका इसमास, 'तू तुझे मोबाईलमध्ये मुलींचे फोटो का काढले? असे म्हणून त्याचा मोबाईल हिसकवल्याचे सांगितले आहे.
५ गुन्हे उघडकीस
आणखीन चौकशी केली असता त्याने कोरेगाव भिमा, शिक्रापूर व दौड परिसरातही अशा प्रकारचे आणखीन गुन्हे केल्याचे सागितले. त्याबाबत खात्री केली असता एकूण ५ गुन्हे दाखल असून ते उघडकीस आलेले आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि. सचिन काळे, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सुभाष राऊत, पोहवा. जनार्दन शेळके, पोना. राजू मोमीन, पोना. अजित भुजबळ, पो.ना. गुरु गायकवाड, पोना. मंगेश थिगळे, पोना. गुरु जाधव, पोना. अक्षय नवले, चा.पोहवा. काशिनाथ राजापुरे यांनी केली.