पुणे - शिरूर लोकसभेची निवडणूक आता प्रतिष्ठेची बनत चालली आहे. जातीपातीचे राजकारण, कोण छत्रपतींचा मराठा मावळा, कोण शेतकऱ्याचा मुलगा, असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी या मतदारसंघात चौकार मारण्याची तयारी सुरू केली आहे. तर राष्ट्रवादीकडून या आढळरावांच्या चौकाराला क्लीन बोल्ड करण्यासाठी अभिनेता अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी देऊन एक विजयाचे गणित बांधण्यात आले आहे. सध्या येथे छत्रपतींच्या नावाने राजकीय लढाई सुरू झाली आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात आजपर्यंत विकासकामांचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवली जात होती. मात्र यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना केंद्रस्थानी ठेवून आपल्या राजकारणाची एक वेगळी दिशा तयार केली अन् सुरू झाली जातीपातीची राजकीय लढाई.
ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे अनेक प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे मी छत्रपतींचा मावळा तुमच्यातील शेतकऱ्यांचा मुलगा आहे. सामान्य जनतेत मिळून मिसळून प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहे, हेच अमोल कोल्हेंचे आव्हान आढळरावांना टोचले की काय, असे आता दिसत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलास लांडे, मंगलदास बांदल या दोघांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून या कार्यकर्त्यांवर अन्याय करत एका सेलिब्रिटीला ही उमेदवारी दिल्याची खंत शिवसेनेचे उमेदवार आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. या मतदार संघात सामान्य जनतेची कामे करणारा त्यांच्या सुख-दुःखात मिसळणाऱ्या उमेदवाराची गरज असताना एका सेलिब्रिटीला उमेदवारी देऊन माझा रस्ता राष्ट्रवादी काँग्रेसने सोपा केल्याचे आढळराव सांगतात.
राजकारणातील राजकीय लढाई लढत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा दोन्ही उमेदवार सांगत आहेत. मात्र या मतदार संघात सुरू असलेले जातीपातीचे राजकारण छत्रपतींच्या विचाराला तिलांजली आहे का असाही प्रश्न उभा राहत आहे. विजयाचा झेंडा शिरुर लोकसभेवर लावण्यासाठी कोल्हे आणि आढळराव पाटील यांनी कंबर कसली आहे. सामान्य जनतेचा कौल मात्र कोणाकडे जाईल हे येणारा काळच ठरवेल.