पुणे- हाथरस अत्याचार घटनेच्या निषेधार्थ काल रात्री राजगुरूनगर येथे पुणे जिल्हा भीमशक्ती संघटना आणि खेड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी संघटनेकडून घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कँडल मोर्चाची सुरुवात झाली. भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी विजय डोळस यांनी पीडित युवतीच्या परिवाराची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलीस व प्रशासनाकडून मिळालेल्या वागणुकीचा निषेध केला. तसेच, हाथरस येथील पीडितेवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोषींना फाशी द्यावी, अशी मागणी केली.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत तेथील प्रशासनाचा तीव्र शब्दात विरोध करण्यात आला. यावेळी अनिल जाधव, किशोर डोळस, के.डी जाधव, ऋषिकेश डोळस, संजय गायकवाड, देवा खंडागळे, आदींसह शंभरावर नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा- तेरा वर्षांचा 'विशेष' गिर्यारोहक; आशिया बुक ऑफ रॅकॉर्ड्सने केला गौरव