पुणे - शहरातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बाणेर परिसरात मेट्रोच्या खोदकामादरम्यान बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली आहे. ही वस्तू जुने हॅण्डग्रेनेड बॉम्ब असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बॉम्बशोधक व नाशक पथक आणि वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.
यापूर्वी अवाढव्य प्राण्याची हाडे आढळून आली
पुणे शहरातील बाणेर भागात मेट्रोसाठीचे खोदकाम सुरू आहे. बाणेर रस्त्यावरील आयशर कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास खोदकाम सुरू असताना तेथील कर्मचाऱ्यांना बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता प्राथमिक पाहणीत हे जुने हॅण्डग्रेनेड असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाला घटनास्थळावर तैनात करण्यात आले आहे. सध्या या बॉम्ब सदृश वस्तूची तपासणी केली जात आहे. यापूर्वीही मेट्रोचे खोदकाम सुरू असताना स्वारगेट परिसरात जुने भुयार आणि एका अवाढव्य प्राण्याची हाडे आढळून आली होती.
हेही वाचा- भंगार व्यावसायिकाच्या खूनाचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल