पुणे - 'माझं आंगण माझं रणांगण' हे भाजपचे आंदोलन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरून आंदोलनाचा एक फोटो पोस्ट करुन भाजपवर टीका केली आहे. दरम्यान हा फोटो पिंपरी-चिंचवड शहरातील आमदाराच्या भावाचा आहे. त्यामुळे शहरातील राजकारणही ढवळून निघाले आहे.
राज्यात विविध ठिकाणी भाजपने 'माझं अंगण माझं रणांगण' हे आंदोलन आपापल्या कार्यालय, घराच्या समोर आंगणातून करत राज्य सरकारचा निषेध केला. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवर लहान मुले भाजपचा झेंडा हातात घेऊन भर उन्हात आंदोलनात सहभागी झाल्याचा फोटो पोस्ट केला. यात लहान मुलांचा मास्क खाली सरकल्याचे दिसत आहे. त्यावरून ठाकरे शैलीत आदित्य यांनी भाजपवर टीका केली आहे.
पोस्टद्वारे ते म्हणाले, की “हे अगदीच लज्जास्पद आहे. सत्तेच्या लालसेपोटी नेते काय करू शकतात. लहान मुलांना तळपत्या उन्हात उभं करण्यात आले आहे. त्यांच्या तोंडावरील मास्क पूर्णपणे खाली सरकला आहे. आज या मुलांना सुरक्षित आणि घरातच ठेवण्याची गरज असताना राजकीय आंदोलन करताना त्यांचे चेहरेही व्यवस्थित झाकलेले नाहीत. कोरोनाला विसरून गेले. कारण राजकारण प्रिय आहे,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
अनिल देशमुख यांनीही भाजपला फोटोवरून टोला लगावला आहे. त्यांनी केलेल्या पोस्टवर अस म्हटले आहे की, महाराष्ट्र भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी लहान मुलांचा जीवही धोक्यात घालायला तयार आहे. यावरून त्यांना खरंच जनतेची किती काळजी आहे, हे लक्षात येते.