पुणे - शहराच्या सदाशिव पेठेतील ठोक औषधांची विक्री करणाऱ्या जीवन मेडिसेल या दुकानाला आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगित हे संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. औषधांचा मोठा साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार सदाशिव पेठेतील पाटे डेव्हलपर्स या इमारतीच्या तळमजल्यावर जीवन मेडिसेल हे औषधाचे दुकान होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या दुकानाला आग लागल्याचा कॉल आल्यानंतर कसबा पेठ, भवानी पेठ आणि एरंडवणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ रवाना करण्यात आल्या.
घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी आगीमुळे दुकानाचे वितळलेले शटर कटरच्या सहाय्याने कापले आणि आतमध्ये पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
या दुकानाला लागलेली आग ही भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितरित्या खाली आणले आणि इमारत रिकामी केली. तर एकीकडे इतर जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाचे जवान विजय भिलारे, राजेंद्र जगताप, नागलकर आणि इतर जवानांनी ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.