पुणे - कोरोना पार्श्वभूमीवर बकरी ईदसाठी गेल्यावर्षीसारखेच धोरण असणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे देशात सर्व सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे यंदा 21 तारखेला होणारी बकरी ईद देखील गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच साजरी करण्यात यावी, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
'गर्दी करू नये'
'कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्यासंबंधीच्या सोयीसुविधा वाढविण्यात येत आहेत. सरकार नागरिकांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेत आहे. नागरिकांनीही निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करुन सार्वजनिकस्थळी तसेच पर्यटनस्थळी गर्दी करू नये', असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. पुण्यात शुक्रवारी (16 जुलै) जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.
'लोकशाहीत असा निर्णय घेण्याचा अधिकार'
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या 23 गावांच्या विकास आराखड्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. त्यावर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकशाहीत अशा पद्धतीने त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आता सरकार ठरवेल, की 23 गावांचा विकास आराखडा पीएमआरडीएकडे ठेवायचा की महापालिकेकडे. दोन्हीपैकी एकच ठराव करावा लागणार आहे. महापालिका कोणाच्याही ताब्यात असो, जेव्हा लोकप्रतिनिधी येतात तेव्हा त्यात इंटरेस्ट येतो हेही खरं आहे. पाठीमागच्या काळात याचा अनुभव काहींना आलेला आहे. राज्य सरकार उद्याच्या 50 ते 100 वर्षांचा विचार करूनच निर्णय घेणार आहे', असे यावेळी अजित पवार यांनी म्हटले.
लव जिहादरवर काय म्हणाले अजित पवार?
मध्यंतरी पुणे आणि नाशिक येथे लव जिहाद सांगून विविध संघटनांच्यावतीने दोन्ही लग्न रद्द करण्यात आले होते. त्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 'हे चुकीचे असून प्रत्येकाला अधिकार आहे. पण जर कोणी कायदा हातात घेऊन संबंधित मुलगा किंवा मुलींच्या घरच्यांना धमकावत असेल, तर त्यांना पोलीस संरक्षण देण्याचे काम सरकारचे आहे. जर तशी तक्रार आली तर त्याची गंभीरतेने दखल घेतली जाणार', असेही पवार म्हणाले.
'या आठवड्यातील निर्बंध पुढील आठवड्यात कायम'
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आरोग्यासंबंधीच्या सोयीसुविधा वाढविण्यात येत आहेत. सरकार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णवाढीचा दर स्थिर असला तरी या आठवड्यातील निर्बंध पुढील आठवड्यात कायम राहतील. ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी ७ ते दुपारी ४ चा नियम सुरूच राहिल. शनिवार- रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता सर्व पूर्णपणे बंदच राहिल. सोमवारपासून काहीही बदल होणार नाही. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ती लेव्हल ३ वरच राहिल', असेही अजित पवार यांनी सांगितले.
'संस्थात्मक विलगीकरणावर जास्तीत जास्त भर द्यावा'
'नियमांचे पालन करुन काही उद्योगधंदे सुरु आहेत. उद्योगपतींनीही त्यांच्या कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढत आहे. आवश्यक तेवढा लस पुरवठा होत नाही. तरीही जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यात येत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा', असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा - नाशिकचा आसिफ आणि रसिका, "लव जिहाद"च्या आरोपांनी मोडले लग्न, मंत्री बच्चू कडूंनी अशी घडवली समेट