पुणे - 'मंत्रा' या मराठी चित्रपटासह इतर मराठी चित्रपटात सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडलेल्या आणि पुण्याच्या नाट्यक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली. स्वप्नील गणेश शिंदे (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे.
स्वप्नील शिंदे हा पुण्यातील नाट्यक्षेत्रात सक्रिय होता. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'मंत्रा' या मराठी चित्रपटासाठी त्याने सहायक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली होती. शनिवारी सकाळी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्ये मागील नेमके कारण कळू शकले नाही. परंतु, नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.