पुणे - मी नैराश्यात आहे, की माझे मानसिक संतुलन बिघडले आहे, याची काळजी करण्यासाठी भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर समर्थ आहेत. त्याची काळजी अशोक चव्हाणांनी करू नये, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना लगावला आहे. चव्हाण यांनी नुकतीच चंद्रकांत पाटील यांच्यावर 'पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे', अशी टीका केली होती. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात काही औषधांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
लॉकडाऊनच्या काळात मी आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस जेवढे महाराष्ट्रात फिरत आहोत, तेवढे धाडस कोणीही करत नाही, असेही पाटील यावेळी म्हणाले. हे सरकार आपापसातील भांडणं किती दिवस लपवून ठेवणार आहे. केव्हातरी ते चव्हाट्यावर येणारच आहेत. परवानगी न घेता जयंत पाटलांनी पीएची नेमणूक केली, हा विषय चव्हाट्यावर आला. जयंत पाटलांच्या जलसिंचन विभागाच्या काही फायली या मंत्रीमंडळ संमतीनंतरही फायनान्सकडे गेल्या आहेक. तसेच, असे खूप विषय आहेत. आणखी काही दबलेले विषय दोन-तीन दिवसांत बाहेर येतील. तसेच यावर काही बोललं, की सामनात अग्रलेख छापून येतात असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला आहे. दरम्यान, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण व रोजगारासाठी सवलती मिळणे गरजेचे आहे. फडणवीस सरकारने राबवलेले ‘जे ओबीसींना ते मराठ्यांना’, हे सूत्र अंमलात आणावे. त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - 'म्युकरमायकोसिसचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश'
हेही वाचा - काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली