पुणे: दक्षिण आशियातील एकमेव एटीपी २५० मालिकेतील स्पर्धा असलेल्या टाटा ओपन टेनिस स्पर्धेत (Tata Open Tennis Tournament) पुण्याचा स्थानिक खेळाडू अर्जुन कढे आणि सुमित नागल (Arjun KadheSumit Nagal) यांना अनुक्रमे दुहेरी आणि एकेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे ( wild card entry). टाटा ओपन स्पर्धेला म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, आयएएस विक्रम कुमार, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, उपस्थित होते. स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, राज्य टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांच्यासह भारतीय खेळाडू सुमित नागल, मुकुंद ससीकुमार या वेळी उपस्थित होते. देशातील टेनिसच्या प्रसारात पुण्याची आघाडी आहे यात शंकाच नाही. तरुण कलागुणांचे पालनपोशण करण्यापासून विजेत्यांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यापर्यंत पुणे शहराने प्रत्येक वेळेस निर्णायक भूमिका बजावली आहे. या वेळी महाराष्ट्र सरकारच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
टाटा ओपन स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे आयोजन करायला मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. गेली चार वर्षे आम्ही यशस्वीपणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावर्षीही स्पर्धा यशस्वी होईल यात शंका नाही. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्व गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीचा एक भाग आहेत. टेनिसला देशात आघाडीवर आणणे हा मुळ उद्देश आहे, असे पुण्याचे विभागीयआयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
या स्पर्धेने पुण्याला आंतरराष्ट्रीय टेनिस नकाशावर आणले आहे आणि हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आम्ही सर्व खेळाडूंचे पुण्यात स्वागत करतो. शाळेतील विद्यार्थ्यांनाही ही स्पर्धा बघायला मिळेल यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले आहेत. अव्वल खेळाडूंचा खेळ पाहताना त्यांना एकप्रकारची प्रेरणा मिळेल. कदाचित भविष्यात त्यांच्यापैकी एखादा खेळाडू टाटा ओपन स्पर्धेत खेळेल, असे पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.
पुण्याच्या नव वर्षाची सुरुवात या आंतरराष्ट्रीय स्पर्धेने होत आहे. पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलासाठी अद्यावत क्रीडा सुविधा आहे. पुण्याला क्रीडा राजधानी मानले जाते. आयोजन समितीने ही ओळख या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करून अधिक दृढ केली आहे. त्याला महाराष्ट्र सरकारनेही साथ दिली. या स्पर्धेत एकूण २५०हून अधिक तरुण टेनिसपटू स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. सर्वांचाच उत्साह दांडगा आहे. आम्ही या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप उत्सुक आहोत, असे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे म्हणाले.
स्पर्धेत पुण्याचा स्थानिक खेळाडू अर्जुन कढे ब्राझीलच्या फर्नांडो रॉम्बोलीसोबत दुहेरीत खेळेल. सुमित नागल आपले एकेरीतील स्थान नव्याने कमावण्यासाठी खेळेल. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावर असलेल्या मरिन चिलीचसह पहिल्या १०० मानांकनातील १७ खेळाडू खेळणार आहेत. सरकारच्या भक्कम पाठिंब्याशिवाय इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन शक्य नाही. अशा स्पर्धेचे आयोजन करण्याचे संधी आम्हाला मिळाली हे भाग्यच आहे. गेल्या वर्षी स्पर्धेच्या आयोजनाचे एटीपीने कौतुक केले होते. कोव्हिड आव्हानाचा सामना करून आम्ही या स्पर्धेचे सुसह्य आयोजन केले होते. अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यासाठी इच्छा व्यक्त केली हे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. पुणे आता खेळाडूंचे आवडते केंद्र ठरत आहे, असे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले.
भारतीयांना वाइल्डकार्ड मिळणे हे नेहमीच आनंददायी असते कारण या स्पर्धेचे आयोजन करण्याचे एक उद्दिष्ट भारतीयांच्या सहभागास प्रोत्साहन देणे आहे कारण ते देशातील टेनिसच्या वाढीस हातभार लावते. आमच्या स्थानिक खेळाडूंना जगभरातील अव्वल खेळाडूंविरुद्ध लढताना पाहून अनेक तरुणांना या खेळात सहभागी होण्याची प्रेरणा मिळते. मला खात्री आहे की नागल आणि शसीकुमार दोघेही याचा फायदा घेतील आणि चांगली कामगिरी करतील असे अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर म्हणाले.