पुणे : शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा फ्री पास मिळावा म्हणून पोलिसांनेच धमकी दिल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. विशेष म्हणजे शिवपुत्र संभाजी या महानाट्यातील प्रमुख कलाकार खासदार अमोल कोल्हे हे आहेत. दरम्यान मोफत पास पाहिजे म्हणून नाटक बंद पाडण्याची धमकी पोलिसाने दिली असल्याची माहिती स्वत:खासदार कोल्हे यांनी व्हिडिओ शेअर करत दिली आहे. डॉ.अमोल कोल्हे हे शिरुर लोकसभेचे खासदार आहेत, त्यांच्या नाटकावेळी पोलिसाने धमकी दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कुठे होते नाटकाचे आयोजन : शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पिंपरी चिंचवड शहरातील एच ए ग्राउंडवर आयोजित करण्यात आले आहे. या महानाट्याला पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या महानाट्याचे फ्री पास मिळावे म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पोलिसाने चक्क नाटकाच्या आयोजकाला धमकी दिल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला. कोल्हे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला असून यातून त्यांनी एक कळकळीची विनंती केली आहे.
मोफत पाससाठी पोलिसाची धमकी : "फ्री पास दिला नाही, तर नाटक कसं होते ते मी पाहतो" असे म्हणत पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने चक्क नाटकाच्या आयोजकाला धमकी दिल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचा आरोप स्वतः अमोल कोल्हे यांनी महानाट्याच्या व्यासपीठावरून केला आहे. त्यासोबतच त्यांनी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करावी, अशी मागणी देखील केली.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हत्येच्या घटना..: एकीकडे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसाढवळ्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची निर्घृण हत्या होत आहे. तर दुसरीकडे पोलीस किरकोळ तिकिटासाठी धमक्या देण्यात मग्न आहेत. ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान या प्रकाराबाबत आपण गृहमंत्र्यांना तात्काळ बोलणार असल्याचे कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हेंनी व्यक्त केली खंत: संभाजीनगर, कोल्हापूर, निपाणी या ठिकाणी या नाटकाचे प्रयोग झाले त्यावेळी पोलिसांनी सहकार्य केले. नाशिकमध्ये तर पोलीस आयुक्तांनी अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह तिकीट काढून हा प्रयोग दाखवला होता. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये आज अतिशय खेदजनक अनुभव आल्याचा अमोल कोल्हे म्हणाले. शिवपुत्र संभाजी नाटकाची मोफत तिकीट दिले नाही तर या नाटकाचा प्रयोग कसा होतो, अशी धमकी पोलीस कर्मचाऱ्याने दिली. आपला या व्यक्तीला विरोध नसून अशाप्रकारे फ्री पास मागणाऱ्या प्रवृत्तीला विरोध असल्याचे कोल्हे म्हणाले.
हेही वाचा -
- Shiv Jayanti 2023: शिवनेरी येथे अमोल कोल्हे यांचे भगवा ध्वज जाणीव आंदोलन, आमदार अतुल बेनके यांनी दिला पाठिंबा
- Amol Kolhe Celebrate Shiv Jayanti : शिवजयंती साजरी करण्यासाठी मी दरवर्षी पायी गडावर येतो - खासदार अमोल कोल्हे
- Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीत राहणार की भाजपमध्ये जाणार? सूचक वक्तव्याने चर्चांना पुन्हा उधाण