पुणे - शिरूर तालुक्यात आज भाजपचे उमेदवार बाबुराव पाचार्णे यांच्या प्रचारार्थ भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीतून शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे रहाण्याचे आवाहन अमित शाहंनी यावेळी केले.
शिरूर-हवेली मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस व भाजप अशी लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांनी या मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या मतदारसंघात दोन्हीही पक्षांचे राष्ट्रीय नेते येत आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा कोणाचा झेंडा फडकणार हे पुढील काळातच पहावे लागणार आहे.
हेही वाचा - 'कलम 370 निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?'
सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये राजकीय नेत्यांच्या सभांची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. यामध्ये राष्ट्रीय नेतेही विधानसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत. नागरिकांचाही काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी अनेक जण हे आजही शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळाले.
शिरुरमध्ये अमित शाहंना महापुरुषांचा विसर
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरून या रॅलीची सुरवात झाली. विद्याधाम प्रशालेजवळ या रॅलीची सांगता झाली. ज्या ठिकाणावरून या रॅलीची सुरवात झाली, त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. तर शहरातील बसस्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होता. परंतु, या दोन्ही ठिकाणच्या पुतळ्यांना अभिवादन न करताच शाह निघून गेले. त्यामुळे ज्या महापुरूषांच्या नावाने हे मत मागतात त्याच महापुरुषांचा विसर पडलाय की काय अशी, चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये होती.
हेही वाचा - पंकजा मुंडेंच्या सभेत रिंगरोड बाधित नागरिकांचा गोंधळ, पाच जण ताब्यात