बारामती (पुणे) - बारामती शहरातील व्यापारी प्रीतम शहा यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी अधिकचा तपास करण्याकरिता कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयात केली होती. त्यानंतर आज न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत २ दिवासांची वाढ केली आहे.
बारामती शहरातील व्यापारी प्रितम शहा यांच्या आत्महत्येप्रकरणी बारामती नगरपालिकेचे विद्यमान अपक्ष नगरसेवक जयसिंग देशमुख, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे, कुणाल काळे, प्रविण गालिंदे, हनुमंत गवळी, सनी आव्हाळे यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.आर.वाघडोळे यांनी त्यांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
असा झाला युक्तिवाद -
सरकारी पक्षाची बाजू मांडताना सरकारी वकील ॲड. श्रीकांत पोंद्कुले यांनी सदर आरोपींकडून आणखी तपास करायचा आहे. त्यांनी केलेले अन्य व्यवहार तपासायचे आहेत. त्यामुळे पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी केली. तर बचाव पक्षाच्या वतीने ॲड.राजेंद्र काळे, ॲड.डी.डी शिंदे यांनी यास विरोध केला. एक वर्षापूर्वी झालेल्या जमीन खरेदी व्यवहारात तक्रारदाराची स्वाक्षरी आणि मान्यता आहे. त्यामुळे या व्यवहाराच्या एक वर्षानंतर झालेल्या आत्महत्येस कसे जबाबदार धरता येईल, असा युक्तिवाद करून आरोपींच्या वतीने पोलीस कोठडीस विरोध दर्शविला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदर सहा जणांची दोन दिवसांनी पोलीस कोठडी वाढवली आहे.
सदर प्रकरणातील नऊ पैकी सात जण अटकेत-
बारामती येथील व्यापाराच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दिवशीच सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे- देशमुख, जयेश उर्फ कुणाल काळे, संजय कोंडीबा काटे, हनुमंत सर्जेराव गवळी, प्रवीण दत्तात्रय गालिंदे, सनी उर्फ सुनील आवाळे यांंचा समावेश आहे. तर अन्य तीन फरार आरोपींपैकी विकास नागनाथ धनके यास काल अटक करण्यात आली आहे. प्रवीण गालिंदे यांना न्यायालयीन तर अन्य सहा जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
असे आहे प्रकरण-
मृत प्रितम शशिकांत शहा यांना वरील आरोपींनी व्याजाने पैसे दिले होते. दिलेल्या पैशाच्या व्याज वसुलीसाठी तसेच बारामती शहरातील सह्योग सोसायटी येथील बंगला नावावर करून घेऊन प्रितम शहा यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. असे आत्महत्येपूर्वी शहा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात सुसाईड नोट लिहून ठेवली होती. तसेच त्या चिठ्ठीत वरील आरोपींच्या नावांचा उल्लेखही केला होता. त्यानुसार प्रितम शशिकांत शहा यांचा मुलगा प्रतिक शहा यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.