पुणे - सध्या राज्यभरासह पुणे शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशावेळी अनेक जणांना प्लाझ्माची गरज पडत आहे. मात्र, अनेक जण कोरोनावर मात करून घरी जात आहेत, पण ते प्लाझ्मा दानसाठी तयार होत नाही. पुण्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील अधिक असताना कोणीही पुढे येत नाही. अशात एका गृहस्थाने तब्बल १४ वेळा प्लाझ्मा दान करत रेकॉर्ड बनवला आहे.
हेही वाचा - मातृदिन विशेष : अवघ्या ४ महिन्याच्या बाळाला घरी ठेऊन पुन्हा कामावर रुजू
14 वेळा प्लाझ्मा दान करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
कोथरूडमध्ये राहणारे अजय मुनोत यांनी आजवर तब्बल चौदावेळा प्लाझ्मा दान केला आहे. त्यांच्या या दानशूर वृत्तीचे सगळीकडेच कौतुक होत आहे. मुनोत हे विपणन सल्लागार म्हणून काम करतात. त्यांना जुलै २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा २६ ऑगस्ट रोजी प्लाझ्मा दान केले आणि ७ मे रोजी त्यांनी चौदाव्यांदा प्लाझ्मा दान केले. त्यांच्या या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
४० हून अधिक लोकांना मिळाले प्लाझ्मा
मुनोत यांच्यामुळे जवळजवळ ४० हून अधिक लोकांना प्लाझ्मा मिळू शकल आहे. ६३ वर्षीय सरस्वती सोनवणे यांना प्लाझ्माची अत्यंत गरज होती, अशावेळी मुनोत यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता प्लाझ्मा दान केला आणि त्यांचे प्राण वाचवण्यात मदत केली. सरस्वती सोनवणे यांचा मुलगा पंकज सोनावणे यांनी अजय मुनोत यांचे आभार देखील मानले आहेत.
रेकॉर्ड पेक्षा रुग्णाचे प्राण महत्त्वाचे
मुनोत म्हणाले, 'आतापर्यंत मी 14 वेळा प्लाझ्मा दान केले आहे. यापूर्वी इंग्लंडमधील एका व्यक्तीने १० वेळा, तर भारतातील एका व्यक्तीने सहा वेळा प्लाझ्मा दान केल्याचे इंटरनेटवरील माहितीमध्ये आढळले. आपण 14 वेळा प्लाझ्मा दान केल्याचा आनंद आहे. विक्रम करण्याच्या हेतूपेक्षा रुग्णांना आपला प्लाझ्मा उपयोगी ठरू शकतो, त्यांचे प्राण वाचतात, याचा आनंद आहे.
कोविड काळात प्लाझ्मा दान करणारे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात असताना मुनोत यांच्यासारखे प्लाझ्मा दाते आपला दानशूरपणा दाखवून इतरांना देखील प्रेरणा देत आहेत. त्यामुळे, तुम्हीही कोरोनामुक्त झाला असाल आणि प्लाझ्मा देऊ शकत असाल तर निश्चित द्या, कारण तुमच्यामुळे चार जणांचे जीव वाचणार.
हेही वाचा - गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोघे पोलिसांच्या जाळ्यात, शिक्रापूर पोलिसांची कारवाई