परभणी - परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आणखी 3 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. यामधून मात्र जिल्ह्यातील जिंतूर आणि सोनपेठ या नगरपालिका क्षेत्रांना वगळण्यात आले आहे. जिल्ह्यात रविवारी देखील सेलू येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला आहे.
दोन आठवड्यांपासून आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे परभणी जिल्ह्यात सर्व नागरी भागात शुक्रवारपासून संचारबंदी लागू आहे. मात्र, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी देखील पुन्हा कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या संचारबंदीत वाढ केली आहे. यामध्ये परभणी मनपा हद्द आणि लगतचा 5 किमीचा परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर पंचायतींच्या हद्दीत व त्यालगतच्या 3 किमी परिसरामध्ये ही संचारबंदी लागू राहणार आहे.
संचारबंदीमधून जिंतूर आणि सोनपेठ या नगरपालिका क्षेत्रातील परिसराला सूट देण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेतच कामकाज किंवा बाजारपेठा उघड्या राहतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सद्यस्थितीत जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असून, तपासणीनंतर यातील व्यक्ती कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
सूट दिलेल्या कालावधीत नागरिकांची मोठ्या प्रमाणात बाजारपेठ, दुकानांवर व सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची उपाययोजना केली आहे. तर परभणी महानगरपालिकेने परजिल्ह्यातून परभणीत येणार्या प्रत्येक व्यक्तीला 5 दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक केले आहे. अशा उपाययोजना केल्या असल्या तरी रविवारी देखील सेलू येथे स्टेट बँकेत कार्यरत असणारा व परभणी शहरातील विष्णुनगर मध्ये राहणारा 37 वर्षे कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी विष्णुनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे, तर सेलू येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा 8 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदर बँके आणि विष्णुनगर परिसरात निर्जंतुकीकरणाचे काम सुरू झाले. तर हा परिसर सील करण्याची प्रक्रिया संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत. दरम्यान एका रुग्णामुळे परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 143 एवढी झाली आहे. त्यातील 98 रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परभणी जिल्हा रुग्णालयाच्या संक्रमित कक्षात सद्यपरिस्थितीत 31 रुग्ण कोरोनाचे उपचार घेत आहेत.