परभणी - मुरुंबा येथील सुमारे 8 हजार कोंबड्या बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर नष्ट करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कालच मुरुंबा आणि परिसरातील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल पुणे येथून प्राप्त झाला आहे. तसेच या गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून येथील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
'कुपटा येथे देखील 400 कोंबड्यांचा मृत्यू -
दरम्यान, मुरुंबा येथील घटनेनंतर काल संध्याकाळी कुपटा (ता.सेलू) येथील 400 कोंबड्या मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. त्या ठिकाणच्या मृत कोंबड्यांचेही नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मात्र, अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे नेमके कारण सध्यातरी स्पष्ट करता येणार नाही, असेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले.
संक्रमण होत नसल्याने घाबरू नये -
दरम्यान, बर्ड फ्लू हा आजार पक्षांकडून मनुष्याकडे संक्रमित होत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. मात्र, ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतील, त्या ठिकाणच्या लोकांनी प्रशासनाला माहिती द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भात योग्य ती खबरदारी प्रशासन घेत असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
अहवाल आल्यानंतर देण्यात येईल सूचना -
तालुक्यातील मुरूंबा येथील एक हजारच्या आसपास कोंबड्या मृत्यू पावल्या होत्या. याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनासह पशूसंवर्धन विभागाने घटनास्थळी धाव घेत आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या. त्याचबरोबर मृत्यू पावलेल्या कोंबड्यांचे नमूने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यात बर्डफ्लूमुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने संबंधित विभागांना उपाययोजना आणखी कठोर करण्याबाबत सूचना दिल्या. त्याचबरोबर पशूसंवर्धन विभागाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशूवैद्यकीय व पशूविज्ञान महाविद्यालयाशी संपर्क साधला. तेथील सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.नितीन मार्कंडेय यांच्याशी चर्चा केली.
कोंबड्या नष्ट करण्यासाठी फार्म चालकांना औषधांचे वाटप -
दरम्यान, आज (सोमवारी) सकाळी या संदर्भात पशूसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे परभणीच्या पशूसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांना सूचना केल्या. त्यानुसार मुरूंबा गावात स्वच्छता व निर्जंतुकीकरणावर भर दिल्या जात असून, मृत पावलेल्या कोंबड्या नष्ट करण्यासाठी तसेच शिल्लक राहिलेल्या कोंबड्यादेखील नष्ट करण्यासाठी पोल्ट्री फार्म चालकांना औषधांचे वाटप केले आहे. यामध्ये एक किलोमीटर पसिरातील हा विषाणू इतरत्र पसरणार नाही, याचीही काळजी घेण्यासाठी परिसरातील आठ हजार कोंबड्या नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार सोमवारी त्याबाबत कार्यवाही पशूसंवर्धन विभागाकडून पूर्ण करण्यात येत आहे.
हेही वाचा - 'नारायण राणेंची सुरक्षा काढली, मग वैभव नाईकांना सुरक्षा कशी?'