परभणी - दोन गटातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करून त्यांनाच मारहाण केल्याची गंभीर घटना पालम तालुक्यातील कापसी येथे घडली. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात आज (22 मे) 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालम तालुक्यातील कापसी गावात काल (21 मे) रात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये भांडण झाले. ते सोडविण्यासाठी कापसी येथील काही ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले होते. तेव्हा फौजदार विनोद साने व पोलीस नायक बलभीम पोले हे वाहन घेऊन कापसी गावात दाखल झाले. तेव्हा पोलीस विचारपूस करीत असताना पोलिसांसमोरच एका गटाने दुसऱ्या गटातील एका व्यक्तिला मारहाण केली.
येथे का आले म्हणून पोलिसांनाच मारहाण
पोलिसांनी गावातील दोन गटात होणारी हानामारी सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु 'तू इथे का आलास, आम्हाला का विचारतोस', असे म्हणत आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी पोलीस नायक बलभीम पोले यांना मारहाण केली. त्यातील एका आरोपीने 'तूला खतमच करतो' असे म्हणून बलभीम पोले यांच्या डोक्यात दगड मारला. त्यामुळे पोले यांच्या डोक्यातून रक्त आले. ते पाहून फौजदार विनोद साने यांनी जमावाची पांगवापांगव केली. त्यांनी जमावाच्या गराड्यातून कसेबसे पोले यांना बाहेर काढून गाडीत बसवले आणि पालम ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
गंभीर जखमी झाल्याने नांदेडला हलवले
पोलीस नायक बलभीम पोले हे गंभीर जखमी झाले. पालम येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे पाठवून दिले. पोले यांच्या डोक्याला 4 टाके पडले आहेत. त्यानंतर पोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (कलम 307, 353, 332, 341, 143, 147, 148, 149 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 नुसार) मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणात आरोपी आत्माराम हरीभाऊ जाधव, बळीराम हरिभाऊ जाधव, वैभव गोविंद जाधव, गोविंद बळीराम जाधव, गोपाळ गोविंद जाधव, हरिभाऊ बळीराम जाधव, अर्जुन नामदेव घोगरे, सुमन हरीभाऊ जाधव, लक्ष्मण कोंडीबा बांडे (सर्व राहणार कापसी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार विनोद साने अधिक तपास करीत आहेत. सध्या हे आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - पोलीस अधिकाऱ्याने वृद्ध महिलेचा भाजीपाला फेकला रसत्यावर; व्हिडिओ व्हायरल