परभणी - पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने एका दिवसात तीन कारवाया करून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला. तर अनेक जुगाऱ्यांवर देखील कारवाई केली आहे. परभणी जिल्ह्यातील अवैध धंद्यासह गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी विशेष पथकांची स्थापना केली आहे. या पथकांच्या माध्यमातून दररोज अवैद्य धंद्यांवर छापा मारण्याचा धडाका सुरू आहे. गुरुवारी (17 डिसें.) पथकाने केलेल्या तीन कारवाईत एकूण 3 लाख 81 हजार 368 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
'3 लाख 48 हजार 148 रुपयांचा मुद्देमाल जप्त'
मानवत शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात एका चारचाकीतून शासनाने राज्यात बंदी घातलेल्या गुटख्याच्या साठ्यासह 5 गुटखा माफियांना पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पथकाने चारचाकीतील तब्बल 3 लाख 48 हजार 148 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
'सेलूच्या कारवाईत 5 आरोपी अटक'
सेलू तालुक्यातील वालूर शहरात पथकाने मटका जुगार सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली. यावरून गंगाधर संभाजी आंबटवार, अनिल दत्ताप्पा महाजन, गजानन अशोक माळी (सर्व रा. वालूर ता.सेलू) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मटका जुगार साहित्यासह 18 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कर्मचारी विष्णू भिसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पथकाच्या दुसऱ्या एका कारवाईत याच गावातील आठवडी बाजारात पानपट्टीवर धाड टाकून मटका जुगार चालवणारे अंगद उत्तमराव मगर, अशोक बाबूराव नालींदे (रा.सेलू) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मटका जुगार साहित्यासह एकूण 14 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात पोलीस नाईक अजहर पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - दैठणा पोलिसांनी पकडला 547 पोते तांदूळ; महसूल प्रशासनाकडून तपासणी सुरू
हेही वाचा - परभणी : कर्ज आणि नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या