परभणी - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्षांचे झेंडे उतरविण्याचे काम सुरू झाले आहे. शिवाय विविध पक्षांचे फलक देखील झाकण्यात आले आहेत. आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा - आचारसंहिता लागताच पालिकेत पदाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शुकशुकाट
परभणी शहर महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी शनिवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन आचारसंहितेबाबत कडक सूचना दिल्या. स्वच्छता निरिक्षकांनी त्यांच्या प्रभागातील बॅनर्स, झेंडे व पाट्या काढून घेण्यास सांगण्यात आले. तसेच शहर अभियंत्यांना शहरातील बुथची पाहणी करून अहवाल द्यावे, तर सहाय्यक आयुक्तांनी बुथ व्यवस्थेची पाहणी करावी, असे आदेश दिले. कुठल्याही राजकीय नेत्यांच्या सभा पूर्वपरवानगीशिवाय होऊ नयेत. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करावी. विभागप्रमुखांनी आयुक्तांच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना सुट्या देवू नयेत, अशा सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या. कामात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - जालना,औरंगाबादेत आचारसंहिता लागू.. पदाधिकाऱ्यांची वाहने झाली जमा
दरम्यान, आयुक्त पवार यांच्या आदेशानंतर तत्काळ संबंधित विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी शहरात फिरून विविध पक्षांचे झेंडे खाली उतरवले. तसेच पक्षीय प्रचार होईल, असे फलक देखील काढण्यात आले आहेत. तसेच अनेक बोर्ड झाकण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या दृष्टीने अनेक राजकीय पुढार्यांना सूचना देखील देण्यात येत आहेत.