परभणी - सुटलेल्या रेल्वे गाडीतून स्थानकावर उतरणाऱ्या वृद्ध जोडप्याचे रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले आहेत. धावत्या गाडीखाली येण्यापूर्वीच पोलीस निरीक्षकाने जीवाची पर्वा न करता त्या जोडप्याला ओढून घेतले. हा प्रकार परभणी रेल्वे स्थानकावरील असून तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
परभणी रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक ११२०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-अजनी एक्स्प्रेस गाडी २९ जानेवारी रोजी सुटली असता, निवृत्ती कांबळे (वय ७०) आणि यमुनाबाई कांबळे (वय६५) ( दोन्ही रा. जिंतूर, जि. परभणी) हे चालत्या गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते. यातच त्यांचा तोल जावून ते फलाटावर खाली पडले आणि घरंगळत धावत्या रेल्वे खाली जात होते. त्याच फलाटावर कर्तव्य बजावत असलेले रेल्वे पोलीस निरीक्षक मुकेश कुमार यांनी तत्काळ क्षणाचाही विलंब न लावता धावून तिथे पोहोचले आणि घरंगळत रेल्वे खाली जाण्याची शक्यता असलेल्या या जोडप्याला अलीकडे ओढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, मुकेश कुमार यांचे शौर्य कौतुकास्पद असल्याचे मत अप्पर रेल्वे व्यवस्थापक विश्वनाथ ईर्या यांनी व्यक्त केले. तसेच त्यांना रेल्वे विभागातर्फे पुरस्कार घोषित केला. शिवाय त्यांची प्रेरणा घेवून बाकीच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारे कर्तव्य बजावले पाहिजे, असे आवाहन केले. या प्रमाणेच विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन देव यांनी 'सर्व रेल्वे पोलीस यांना आवाहन केले की, त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेकरिता जीवाची पर्वा न करता कार्य करावे आणि भारतीय रेल्वे मध्ये एक चांगले उदाहरण जनतेला द्यावे, असे सांगितले.