परभणी - शहरासह जिल्ह्यात प्रशासनाने 23 एप्रिलपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठांसह चौक व रस्ते कमालीचे सामसूम झाले आहेत. विशेष म्हणजे शहराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतल्या जात आहे. हवेतून शहरातील संचारबंदीचा आढावा घेण्यात येत असून, ठीक ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. ज्यामुळे ही संचारबंदी यशस्वी होताना दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाने वैद्यकीय सेवा व औषधी दुकानांव्यतिरिक्त अन्य आस्थापने पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचा परिणाम शहरासह जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठा दोन दिवसांपासून कडकडीत बंद आहेत.
विनामास्क फिरणार्या व्यक्तींविरुध्द दंडात्मक कारवाई
वसमत रस्त्यावर वसंतराव नाईक पुतळा व खानापूर नाका या ठिकाणी नवामोंढा पोलिसांनी तसेच शिवाजी चौक भागात नानलपेठ पोलिसांनी चेकपोस्ट उभारले आहेत. रस्त्यावर फिरणार्या व्यक्ती व वाहनधारकांना अडवून विचारपूस केली जात आहे. विनामास्क फिरणार्या व्यक्तींविरुध्द दंडात्मक कारवाई सुरु आहे.
..म्हणून ड्रोन द्वारे पाहणे
दरम्यान, शहरातील संचारबंदीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून संपूर्ण शहरावर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवल्या जात आहे. ज्या भागात विनाकारण फिरणारे नागरिक दिसून येत आहेत, त्या ठिकाणी तत्काळ पोलीस पाठवून कारवाई करण्यात येत आहे. शिवाय विनाकारण पोलिसांशी वाद घालणारे तरुण देखील या कॅमेऱ्याच्या नजरेत येत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होत आहे. परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, वसमत रोड, जिंतूर रोड, पाथरी रोड, गंगाखेड रोड, उड्डाणपूल, सुभाष रोड, जिल्हा रुग्णालय परिसर आदी भागात या ड्रोन कॅमेऱ्याची नजर आहे. या भागातील परिस्थिती पोलिसांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रूममध्ये बसून पाहणे शक्य होत आहे.