परभणी - ऊन, वारा आणि पाऊस झेलत कठीण प्रसंगी काम करणाऱ्या आणि कोरोना महामारीत दिवसरात्र काम करून नागरिकांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'फ्रंटलाईन वर्करचा' दर्जा द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी परभणीच्या वीज वितरण कंपनीतील आधिकारी व कर्मचार्यांच्या सहा संघटनांनी आज सोमवारपासून काळ्या फिती बांधून 'कामबंद आंदोलन' सुरू केले आहे.
कोणतेही संरक्षण मिळत नाही -
गेल्या एका वर्षापासून वीज कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गादरम्यान देखील काम करत आहेत. वीज पुरवठा सुरळीत ठेवत आहेत. परंतु कंपनीद्वारे या अधिकारी, कामगारांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळत नसल्याचा आरोप यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज पतंगे यांनी केला आहे.
महामारीत काम करूनही 'फ्रंटलाईन वर्कर'चा दर्जा नाही -
संपूर्ण महामारीत पूर्णवेळ काम करून देखील अद्याप वीज कर्मचाऱ्यांना 'फ्रंटलाईन वर्कर' म्हणून दर्जा बहाल करण्यात आलेला नाही. विमा संरक्षण सुद्धा दिले गेले नाही. आपत्तीच्या काळात अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत असताना सुद्धा कंपनीच्या उच्च पदस्थ पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आजपर्यंत याकडे दूर्लक्ष केले. या प्रकाराबद्दल संपकरी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीने तसेच सरकारने तातडीने दखल घ्यावी व आम्हाला फ्रंटलाइन वर्कर म्हणून दर्जा बहाल करावा, तसेच अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना विमा संरक्षणाचे कवच उपलब्ध करावे, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
हेही वाचा - ब्लाऊजने गळा आवळून सुनेने केला सासूचा खून, मृतदेह झाडीत फेकताना सीसीटीव्हीत कैद