परभणी - जिल्ह्यातील पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. कालच्या प्रमाणे आज (बुधवारी) देखील आणखी 4 कोरोनाबाधित पोलीस आढळून आले असून, त्यात परभणी शहरातील वाहतूक शाखा, चुडावा, पूर्णा आणि चारठाणा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या प्रमाणेच जिल्हा कचेरीतील कर्मचारी देखील कोरोनाबाधित आढळून आला आहे, तर दुपारपर्यंत एका माजी नगरसेवकासह अन्य दोन कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा विभागात कार्यरत 36 वर्षीय कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून तो आजारी होता. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे रॅपिड एंटीजन किटवर तपासणी केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान तो कर्मचारी पाच दिवसांपासून सुट्टीवर होता. मात्र, त्यापूर्वी त्याच्या संपर्कात आलेल्या 6 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी ई-पास देणाऱ्या कक्षातील कंत्राटी कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला होता, तर त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी एकास कोरोना झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर काम करणारा आणखी एक जण पॉझिटिव्ह आला असून, तेथे कार्यरत कर्मचारी सध्या क्वारंटाइन आहेत. त्यानंतर आता लेखा विभागातील हा कर्मचारी कोरोनाबाधित आढळला आहे.
याप्रमाणेच जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 51 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदर कर्मचारी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाला उपस्थित होता. याशिवाय पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 37 वर्ष पोलीस कर्मचारी आणि पूर्ण पोलीस ठाण्यातील एका 40 वर्षे कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याप्रमाणेच शहर वाहतूक शाखेच्या एका कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली असून, त्याचा संसर्ग त्याची पत्नी आणि मुलापर्यंत पोहोचलो आहे. ते दोघे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
विशेष म्हणजे कालच नवामोंढा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने 12 कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले. यापूर्वी देखील नवा मोंढा पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी बाधित आढळून आला होता. तसेच मानवत, सेलू, जिंतूर, पाथरीसह अन्य काही ठिकाणचे पोलीस कर्मचारी देखील यापूर्वी कोरोना बाधित आढळून आले आहेत. पोलीस दलात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असून, सर्वच पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची तपासणी व्हावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.
माजी नागरसेवकासह 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आज (बुधवार) सकाळी परभणी शहरातील विवेक नगरातील रहिवासी 65 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाला. तर शहरातील काद्राबाद प्लॉट येथील माजी मनपा सदस्य असलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर परभणी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रमाणेच पूर्णा तालुक्यातील गौर येथील 60 वर्षीय महिलेचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या तीनही मृतांवर मनपा प्रशासनाकडून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता 86 झाली आहे.