परभणी - गंगाखेडमध्ये पार पडलेल्या शाही विवाह स्वागत सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील संशयितांच्या रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. यामध्ये मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या तपासण्यात 19 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापूर्वी आलेल्या अहवालात 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला होता. वराच्या पित्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून आरोग्याचा खर्चही वसूल केला जाणार आहे.
गंगाखेड येथील राधेश्याम भंडारी या जिनिंग उद्योजकाच्या चिरंजीवाचा शाही विवाह स्वागत सोहळा 28 जून रोजी गंगाखेडमध्ये पार पडला. या सोहळ्याला शेकडोंच्या संख्येने मित्रपरिवार, नातेवाईक, राजकीय मंडळी आणि अधिकारी देखील उपस्थित होते. या सोहळ्यात काही कोरोनाबाधित सहभाग झाल्याने त्यांचा संसर्ग अन्य लोकांना झाला आहे. पाहता पाहता याचे लोण आता संपूर्ण गंगाखेड तालुक्यात पसरत आहे. या पार्श्वभूमीवर काल शनिवारी उद्योजक राधेश्याम भंडारी यांच्यावर संसर्ग आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.
चाचण्या आणि विलगीकरणाचा खर्चदेखील भंडारी यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. मात्र, या सोहळ्यामुळे गंगाखेडमधील कोरोनाबाधितांची संख्या आता दररोज वाढू लागली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने गंगाखेड शहर आणि तालुक्यातील काही भागात काल शनिवारी सायंकाळपासून रॅपिड टेस्ट घेण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये पहाटे झालेल्या तपासणीअंती तब्बल 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रात्री एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानुसार गंगाखेडमध्ये रात्रीतून 20 बाधित निष्पन्न झाले. यापूर्वी आढळलेल्या बाधितांची संख्या देखील 20 असून, या सोहळ्याच्या संदर्भाने आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या 40 एवढी झाली आहे. यामुळे प्रचंड चिंता व्यक्त होत असून, जिल्हा प्रशासनाने आता गंगाखेडची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना गंगाखेडमध्ये पाठवले आहे. त्यांचे पथक शहरात आरोग्य सर्वेक्षणाचे काम करत आहे.
काल शनिवारी देखील गंगाखेडमधील 9 आणि परभणी शहर तसेच सेलू येथील 3 रुग्ण दुपारपर्यंत आढळून आले होते, त्यात पुन्हा सायंकाळी परभणी, मानवत आणि सेलू या ठिकाणचे प्रत्येकी एक अशा 3 रुग्णांची भर पडली. त्यानुसार शनिवारी दिवसभरात 15 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर त्यात आज सकाळीच पुन्हा गंगाखेडमधील 20 रुग्णांची भर पडली. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल 238 एवढी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सद्यपरिस्थितीत जिल्हा रुग्णालयात 119 जणांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत 5 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर 114 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 3 हजार 145 संशयितांची नोंद झाली असून यातील 2 हजार 935 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.