परभणी - परभणी तालुक्यातील ५० गावांचा विजेचा प्रश्न मिटला असून, वीज वितरण कंपनीच्यावतीने करण्यात येणारा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी मुबलक वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून वीज मंडळाचा पाठपुरावा करत होते. त्यास अखेर यश आले.
परभणी येथील १३२ केव्ही उपकेंद्रातून उपलब्ध असलेल्या एकमेव विद्युत वाहिनीवरून जवळपास ५० गावांना वीज पुरवठा करण्यात येत होता. त्यात ७ उपकेंद्रे तसेच परभणी महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत पुरवठा देखील या एकाच लाईनवरून करण्यात येत होता. परिणामी शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना वीज पुरवठा सातत्याने खंडित होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
'या' गावांमध्ये झाली स्वतंत्र फिडरची व्यवस्था -
विद्युत पुरवठा करणाऱ्या फिडरची विभागणी करण्याची मागणी धर्मापुरी, टाकळी कुंभकर्ण, झरी, टाकळी या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने सातत्याने करण्यात येत होती. परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे, कार्यकारी अभियंता राजेश लोंढे, उपकार्यकारी अभियंता कैलास जमदाडे तथा ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र मानकर, सहायक अभियंता नितनवरे आदिसोबत बैठक घेवून हा महत्वाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सुचना केल्या होत्या. तसेच वीज वितरण कंपनीच्या मुंबईतील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा केला. आता धर्मापुरी, टाकळी कुंभकर्ण, झरी, टाकळी बोबडे, अशी स्वतंत्र फिडर योजना वीज वितरण कंपनीने कार्यान्वित केली आहे. त्यामुळे संबंधीत ५० गावांचा वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.
'गावकऱ्यांनी केला आमदारांचा सत्कार -
शेतकऱ्यांची अनेक दिवसांची मागणी मान्य झाल्यामुळे आज सोमवारी जानेवारी रोजी आमदार डॉ.राहुल पाटील यांचा शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदु अवचार, तुकाराम मुळे, सुंदर देशमुख, बबन सामाले, खाजा काजी, बालासाहेब कदम, प्रसाद आरमळ, अच्युत सामाले, एकनाथ देशमुख, गंगाधर मोरे, भास्कर देवडे, गोपाळ सामाले, गजानन देशमुख, प्रल्हाद देवडे, किशोर देशमुख आदी उपस्थित होते.
हेही वाचा- नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घ्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे