परभणी - 'कोरोना'चा सर्व स्तरावर परिणाम झाला आहे. प्रामुख्याने वाहतुकीतून या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने रेल्वे आणि बस स्थानकात स्क्रीनिंग होणे आवश्यक आहे, अशा सूचना देत आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आज सायंकाळी परभणीच्या बस स्थानकाला अचानक भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. याठिकाणी विभागीय नियंत्रक जोशी यांना बोलावून त्यांनी या संदर्भात काय उपाययोजना करता येईल? याची चर्चादेखील केली.
कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आज सायंकाळी परभणीच्या बस स्थानकाला भेट दिली. यावेळी बस स्थानकात स्वच्छता ठेवावी, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासोबतच पुणे आणि मुंबई आदी भागातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शिवाय या संदर्भात आपण जिल्हा शल्यचिकित्सक यांची उद्या सकाळी भेट घेऊन उपाययोजना करण्यासाठी त्यांना सांगणार आहोत, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. कारण पुणे-मुंबई या ठिकाणाहून बसने प्रवास करून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून हा आजार परभणी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी संशयित प्रवाशांना तपासण्यासाठीची यंत्रणा असणे आवश्यक आहे. तशी यंत्रणा एसटी महामंडळाने उभी करावी, असेदेखील त्यांनी यावेळी सुचवले.
दरम्यान, आमदार पाटील यांना बस स्थानकात स्वच्छतेचा अभाव दिसून आला. यामुळे त्यांनी अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. स्वच्छता कायम राहण्याच्या संदर्भाने पावले उचलण्याचे निर्देश दिले. शिवाय पिण्याचे पाणी आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ अद्यावत करावेत, असेही ते म्हणाले. यावेळी आगारप्रमुख दयानंद पाटील, शिवसेनेचे उपशहरप्रमुख समाजकार्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते.