परभणी - शेतीला वीजपुरवठा करणारे रोहित्र वारंवार जळण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, हे रोहित्र वेळेत दुरुस्त किंवा बदल्या जात नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतितास 50 रुपये नुकसान भरपाई द्यावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निलंबीत करावे, अशी मागणी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत केली. त्यांच्या या प्रश्नावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सकारात्मक उत्तर दिले. या प्रकरणाची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
यंदा पावसामुळे परभणी जिल्ह्यातील सर्व धरणे भरली. यामुळे शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी पुरवले जात आहे. मात्र, रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणारा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. यामुळे मुबलक पाणी असतानाही पिकांना योग्य प्रमाणात पाणी देण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. याबाबत 2005 व 2014 च्या शासन निर्णयानुसार रोहित्र जळल्यानंतर 48 तासाच्या आत ते बदलून नवे रोहित्र बसविणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास संबंधित रोहित्रावर अवलंबून असणाऱ्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना 50 रुपये प्रतितास या प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच या कामी कुचराई करणाऱ्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केली. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.
हेही वाचा - हृदयद्रावक : मुलाची 'ती' आर्त हाक वडिलांनी ऐकलीच नाही
त्यांच्या या प्रश्नावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सकारात्मक उत्तर दिले. या प्रकरणाची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांवर देखील वचक राहणार आहे.