पालघर (वाडा) - नगरपंचायत असो की ग्रामपंचायत यांच्यातील विकास उद्दिष्ट साधण्यासाठी तेथील कर प्रणाली मजबुत असणे गरजेचे असते. या कर प्रणालीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व नगरविकास हातभार लागत असतो. मात्र, वाडा नगरपंचायतीची कर प्रणाली थंडावल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. वाडा नगरपंचायतीची पाणीपट्टी आणि घरपट्टीची लाखो रुपयांची वसुली रखडली आहे. त्याचप्रमाणे येथील विविध शासकीय कार्यालये, निवासस्थाने यांची वसुली तर सोडाच साधी कर आकारणी देखील करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे. त्यामुळे कर थकबाकीमुळे नगरपंचायतीच्या विकासाचे उदिष्ट कसे साध्य होईल, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
वाडा ग्रामपंचायतीचे ६ एप्रिल, २०१७ रोजी नव्याने नगरपंचायतीत रुपांतर झाले. सध्या ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असून १७ प्रभाग आहेत. वाडा शहरात कृषी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समितीचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख कार्यालय, वीज महावितरण, वनविभाग, अशी विवीध शासकीय कार्यालये तसेच काही शासकीय निवसस्थाने आहेत. इमारतींचे जाळेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, वाडा ग्रामपंचायत असताना ही येथील कर प्रणाली थकबाकीत दिसून येत होती. पाणी पुरवठा करणाऱ्या वीज कनेक्शन तोडण्याचा प्रसंगही तत्कालीन परिस्थितीत ओढावला होता.
वाडा नगरपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी सन २०१७ ते २०१९ यावर्षात खोडा दिसून येतो. कोट्यवधींची वसूली लाखात आहे. त्यातच सरकारी कार्यालयाची अजून घरपट्टी वसुली नसल्याची धक्कादायक माहिती देण्यात येत आहे. सन २०१३ - २०१४ साली ग्रामपंचायत अस्तित्वात असताना शासकीय कार्यालयाची नोंदी आहेत. पण कर आकारणी का नाही?याबाबत नगरपंचायत प्रशासन ठोस कारण देत नाही.
यावर वाडा नगरपंचायतीचे करनिर्धारण अधिकारी विवेक घायवट यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, वाडा नगरपंचायती हद्दीत ७० ते ७२ शासकीय कार्यालये आहेत. "नगरपंचायतीचे झोनींग झाले नाही आणि शासकीय कार्यालयाचे मोजमाप घेतले आहे. नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून आम्ही करपट्टीच्या नोटीसा देणार आहोत. आणि झोनींग काम झाल्यानंतर नवीन दराची करपट्टी लावण्यात येणार आहे.
सन २०१७ ची एकुण घरपट्टी १० कोटी १४ हजार ३६५ रुपये तर वसुली ४९ लाख ६९ हजार ८१४ रूपये इतकी आहे. तर पाणीपट्टी एकुण ४८ लाख ४२ हजार ६१४ रूपये तर वसूली १० लाख २ हजार ५९३ रूपये आहे. सन २०१८ ला एकूण घरपट्टी १ कोटी २२ लाख १४ हजार ४४९ रूपये वसुली ६४ लाख ९८ हजार ३८ रुपये तर पाणीपट्टी ७९ लाख १९ हजार ३९१ रुपये याची वसुली ९ लाख ३५ हजार ३९४ रूपये आणि सन २०१९ ला चालू महिन्यापर्यंत एकुण घरपट्टी ४ कोटी ४८ लाख ८६ हजार ३०९ रूपये तर वसुली १८ लाख ३५९ रुपये तर पाणीपट्टी १ कोटी ५१ लाख ४२ हजार ४६७ रुपये तर वसुली ३ लाख ३७ हजार ६९० रुपये अशी वसुली असल्याची माहिती नगरपंचायतीकडून देण्यात आली.