पालघर- वसई विरार महापालिकेतील योगिता जाधव या महिला कर्मचाऱ्याने मनपा आयुक्त गंगाथरण डी हे आपल्याला घरची धुणी, भांडी करायला लावत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाला आता नवे वळण आले असून आयुक्तांविरोधात झालेल्या मनसेच्या राड्यानंतर ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या महिलेला पाठिंबा देऊन तिला पुन्हा कामावर रुजू करू असे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे मनपा आयुक्तांनी महिलेचे आरोप पेटाळले आहेत. आपल्याला बदनाम करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र असल्याचा प्रत्यारोप आयुक्तांनी केला आहे.
योगिता जाधव या गेली पाच वर्ष वसई-विरार महानगरपालिकेत काम करतात. वडिलांच्या मृत्यूनंतर योगिता यांना महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली होती. योगिता यांच्याकडे परिचारिकेचाही अनुभव असल्याने त्यांची नियुक्ती पालिकेच्या रुग्णालयात टंकलेखक पदावर केली होती. असे अनेक कर्मचारी अशाच पद्धतीने महापालिकेत काम करीत होते. अशात महापालिका आयुक्त गंगारथन डी. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सफाई कामगारांचे घोटाळे बाहेर काढून त्यांना त्यांच्या मूळजागी आणले होते. आयुक्त गंगाधरण डी यांनी गेल्या महिन्यात योगिता आणि इतर एका महिलेला घरगुती कामासाठी बोलावले. त्यांच्याकडून धुणी-भांडी, मासे साफ करणे, शौचालय साफ करणे, कपडे धुणे, जेवण बनवणे असे काम करुन घेतले असल्याचा योगिता यांचा आरोप आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते आणि आयुक्त यांच्यात भेटण्यासाठी वेळ न दिल्याने वाद झाला होता. तयानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या प्रकारानंतर महापालिकेच्या वतीने मनसेचे अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले होते. तेव्हापासून मनसे आणि पालिका यांच्यात हा वाद निर्माण झाला आहे.
तर दुसरीकडे हे प्रकरण न्यायालयात गेले असून न्यायालयाने या महिलेला सफाई कामगार म्हणून काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र कामावर रुजू होत नसल्याने कोविड सेंटरमधील रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगून कामावर हजर न राहणाऱ्या कामगारांचे बडतर्फीचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. तर आपल्याला बदनाम करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आयुक्तांनी केला आहे.
महिला कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपाची सविस्तर बातमी- घरकामास नकार? वसई-विरार महापालिकेतील महिला कर्मचारी बडतर्फ...