पालघर/नालासोपारा : पूर्वेकडील रेहमत नगर परिसरात रस्त्यावर बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांना उठवण्यासाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांवर हमरातुमरी होऊन जीवघेणा हल्ला झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली होती. या घटनेत चार महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी सात ते आठ फेरीवाल्यांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून, आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी मंगळवारी चार फेरीवाल्यांना तर बुधवारी एकाला अटक केली आहे.
रेहमत नगरमधील मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे बसून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात पालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर कारवाई करण्यासाठी महापालिका कर्मचारी सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास गेले होते. त्यावेळी हातगाडीवर दोन फळविक्री करणाऱ्यांवर कारवाई केल्यावर त्यांच्यासोबत हुज्जत घातली. फळगाड्या जप्त करून मनपाच्या टेंपोत ठेवत असताना त्या दोघा फेरीवाल्यांनी ५ ते ६ जणांना बोलावून मनपा कर्मचारी मधुकर डोंगरे (५६) यांना मारहाण केली होती. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून शकीब शोएब सिद्धीकी (२१), अमीर शब्बीर सय्यद (२३) , आब्बास सलीम शेख (१९) आणि जुबेर मुस्तफा खान (१८) या चार आरोपींना मंगळवारी अटक केली. तर, बुधवारी एका आरोपीला ताब्यात घेऊन अटक केले आहे. घटना घडल्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
बुधवारी सकाळी पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि झोन तीनचे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
बुधवारी फेरीवाल्यांवर पोलिसांची कारवाई
वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मनपा आणि पोलीस प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी तुळींज पोलिसांनी स्टेशन परिसराच्या आजूबाजूला आणि मुख्य रस्त्यावर बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. मनपा कर्मचायांसोबत मारहाण झाल्याप्रकरणी सात ते आठ फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल केला आहे . चार आरोपींना मंगळवारी अटक करून बुधवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर चौघांना ५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.