पालघर (वाडा) - पालघर जिल्ह्यात वादळी पावसाचे थैमान चालू असताना वाडा तालुक्यातील बिलावली गावातील गायमाळपाडा येथील राजू नथू लाथड यांच्या घराचे शुक्रवारी पहाटे 3:30 वाजता वाऱ्यामुळे पत्रे उडून गेले. यामुळे त्यांच्या घरातील अन्नधान्याची व जिवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली आहे.
वादळी पावसाने राजू लाथड यांच्या घराचे वीस पत्रे उडाले. लाथड यांच्या घरातील कोणीही या घटनेत जखमी झाले नाही. मात्र, रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने घरातील अन्नधान्य भिजले. रात्रभर जागे राहून घरातील सामान व इतरवस्तू पावसापासुन वाचविण्यासाठी लाथड यांनी प्रयत्न केले. गाढ झोपेत असताना अचानक वीज चमकली आणि जोरदार वाऱ्यामुळे काही वेळात पत्रे उडाल्याचा प्रकार घडल्याचे राजु लाथड यांनी सांगितले
या घटनेचे फोटो तलाठ्याला पंचनामा करण्यासाठी पाठवून देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ व लाथड यांनी केला आहे. या घटनेची दखल घेऊन बिलावली-खरिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश जाधव यांनी भेट दिली. शासनस्तरावर नुकसान झालेल्या घराचा पंचनामा करून आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.