वसई (पालघर) मागील सात महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे कामण ते वसई एसटी सेवा बंद होती. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. अखेर ही एसटी सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वसई पूर्वेतील कामण, चिंचोटी, पोमण, नागले या भागातील बहुसंख्य नागरिक वसईच्या विविध ठिकाणी कामासाठी जातात. तर काही शेतकरी आपला भाजीपाला व इतर माल घेऊन वसईला विक्रीसाठी येतात. मात्र एसटी नसल्याने त्यांना प्रवासासाठी अडच येत होती. आता तब्बल 7 महिन्यानंतर एसटी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. खासगी वाहनांत जास्त प्रवासी बसवण्यास परवानगी नसल्याने खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची बेसुमार लूट होत होती. यासाठी कामण ते वसई एसटी सेवा सुरू करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी केली. त्यानुसार ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला एसटी महामंडळाकडून कामण ते वसई एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे.
सध्या सकाळ व संध्याकाळ मिळून चार फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रवासासाठी हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन कामण ते वसई एसटी सेवा सुरू केली आहे. सध्या चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वसईचे आगार व्यवस्थापक दिलीप भोसले यांनी दिली.