पालघर - बोईसर- तारापूर मुख्य रस्त्यावर कुडण ग्रामपंचायत हद्दीत काही समाजकंटकांनी थुंकी लावून पैसे रस्त्यावर ठिकठिकाणी फेकल्याची अफवा पसरली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी येत त्यांनी रस्त्यावर पडलेले पैसे ताब्यात घेतले. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
![palghar latest news palghar rumors news पालघर अफवा थुंकी लावून रस्त्यावर पैसे पालघर बोईसर पालघर न्युज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-01-romoursinpalgharaboutmoneyfoundonstreet-7204237_21042020121450_2104f_1587451490_845.jpg)
![palghar latest news palghar rumors news पालघर अफवा थुंकी लावून रस्त्यावर पैसे पालघर बोईसर पालघर न्युज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-01-romoursinpalgharaboutmoneyfoundonstreet-7204237_21042020121450_2104f_1587451490_338.jpg)
पालघर जिल्ह्यातील सध्या अफवांना पेव फुटलेले असताना नागरिक अनेक तर्कवितर्क लढवत आहेत. पालघर तालुक्यातील कुडण गावात सोमवारी रात्री दहाच्या वाजताच्या सुमारास बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर कुडण ग्रामपंचायतीसमोरच्या भागात 730 रुपये वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले दिसले. मात्र, हे पैसे समाजकंटकांनी थुंकी लावून टाकल्याची अफवा पसरल्याने अनेक लोक रस्त्यावर जमा झाले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले व तारापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणावरून हे पैसे सुरक्षितरित्या उचलून प्लास्टिक पिशवीत भरले.
बोईसर- तारापूर मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणाहून वाहनांची वर्दळ सुरू असते. यामुळे दुचाकीस्वाराच्या खिशातून पैसे पडल्याची शक्यत वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर पसरल्या जाणाऱ्या अफवांमुळे पालघर जिल्ह्यात अनेक अनुचित प्रकार याआधी घडले आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार आहे.