पालघर - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज गडचिंचले येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनास्थळी भेट दिली, तसेच प्रकरणाची माहिती त्यांनी घेतली. ही घटना दुर्दैवी असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून काढून सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी यावेळी दरेकर यांनी केली आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली. या हत्याकांडात जमावाने केलेला हल्ला चिथावणीतून झाला होता. विशिष्ट माथेफिरूनी हा कट रचला होता का? पोलिसांसमोर अमानुषपणे या साधूंची हत्या झाली असता त्यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही? पोलिसांना प्रथम मारहाण झाली असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे, मग अशा मारहाणीची बाब जिल्हा मुख्यालयाला कळवण्यात दिरंगाई का केली? असे सवाल त्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
एक तासाच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी पोहोचण्यास पोलिसांना पाच तास लागले. अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे, तसेच या प्रकरणाची जलदगतीने चौकशी होणे आवश्यक आहे असेही दरेकर यावेळी म्हणाले.